धुळे, 7 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी खान्देशात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारसभेसाठी धुळ्यात पंतप्रधान मोदींच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळ्यात नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा ही धुळे शहरातील गोशाळा मैदानावर पार पडणार आहे. धुळे जिल्ह्यातील पाच व मालेगाव बाह्य मतदार संघातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी उद्या धुळ्यात येत आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून व्यासपीठाच्या मागे तीन हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्थेत बदल –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यासाठी 8 नोव्हेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यानच्या वेळेत साक्री, मालेगाव, चाळीसगाव, सोनगीरकडून येणारी अवजड वाहने सरळ मुंबई-आग्रा महामार्गाने पारोळा चौफुली तेथून गिंदोडिया चौकमार्गे, ऐशी फुटी रोड, तिरंगा चौक, संत कबीर यांच्या पुतळ्याजवळून शहरात येतील. तसेच अवजड वाहने, बस, चारचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी हा आदेश लागू असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ड्रोन उडवण्यास बंदी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. तसेच सक्षम अधिकार्याची परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
हेही वाचा : चार वर्षांच्या कालावधीनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे बनले राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस यांचा ‘असा’ केला पराभव