जळगाव, 22 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 22 मे 2025 रोजी देशभरातील अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत पुनर्विकसित 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले. यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सावदा, मुरतिजापूर, धुळे, लासलगाव व देवळाली या स्थानकांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या पुनर्विकसित स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी भव्य प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग (फसाड), हायमास्ट लाईट्स, आधुनिक प्रतीक्षालये, तिकीट खिडक्या, आधुनिक स्वच्छतागृहे, दिव्यांग व वृद्धांसाठी सुलभ रॅम्प यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच शेड्स, कोच इंडिकेशन सिस्टिम, डिजिटल डिस्प्ले इत्यादी आधुनिक उपकरणांची स्थापना करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्ट, एस्केलेटर तसेच विशेष मार्गांची उभारणी करण्यात आली आहे. ही स्थानके केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता सामाजिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत असून, स्थानक परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रकल्पाचा उद्देश दीर्घकालीन विकास व स्थानिक गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांचा मास्टर प्लॅन तयार करून त्या अनुषंगाने सुधारणा करणे हा आहे. स्थानिक संस्कृती, प्रवासी संख्या व शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व बदल यामध्ये करण्यात येत आहेत. या लोकार्पण प्रसंगी सावदा स्थानक येथे केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा निखिल खडसे, आमदार अमोल जावळे , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक इति पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात शासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, विविध शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, रेल्वे व स्टेशन सल्लागार समित्यांचे सदस्य, बँक व टपाल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग होता. स्थानकांवरील शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.