नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार 5 नोव्हेंबर रोजी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करत स्पर्धेत सलग तीन पराभवांनंतर संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाचे कौतुक केले. यावेळी तुमच्या संघाने केवळ मैदानावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान मिळवले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद –
तत्पुर्वी, पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या विजयाबद्दल सोशल मीडियावरुन अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. दरम्यान, मैदानावर भारतीय संघाच्या पोरींनी दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं बुधवारी पुन्हा एकदा कौतुक केलं. या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत मुक्तपणे संवाद साधला. तसेच यशस्वी होण्याइतकेच तंदुरुस्त राहणे देखील महत्त्वाचे असल्याचे खेळाडूंना पंतप्रधांनी सांगितले.
दीप्ती वर्मासोबत बोलताना ‘जय श्रीराम’चा उल्लेख –
वर्ल्ड चॅम्पियन्स सोबतच्या संवादादरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्माने पंतप्रधान मोदींना सांगितले की, ती 2017 पासून त्यांना भेटण्याची वाट पाहत होती. त्यावेळी त्यांनी आमच्या भारतीय संघाला स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहण्याचे आवाहन केले होते आणि आज ते स्वप्न वास्तवात उतरले आहे. दरम्यान, मी नेहमीच तुमची भाषणे ऐकत असते आणि तुमची शांतपणे काम करण्याची पद्धत ही मला खेळातही मदत करते, असेही दिप्ती म्हणाली.
View this post on Instagram
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दीप्ती शर्माच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलेले “जय श्री राम” आणि तिच्या हातावर भगवान हनुमानाच्या टॅटूचा उल्लेख केला. त्यावेळी दीप्ती हसली आणि म्हणाली की हेच मला शक्ती देते. दरम्यान, श्रद्धा आपल्या जीवनात खूप काही करत असते, असे याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले.
आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल –
या संवादात कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 मध्ये पंतप्रधानांना भेटल्याची आठवण सांगितली. ती म्हणाली की, 2017 मध्ये आम्ही तुमच्यासोबत भेटलो होते. परंतु, त्यावेळी आमच्याकडे ट्रॉफी नव्हती. आता आमच्याकडे ट्रॉफी देखील आली आहे. आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल, असेही ती म्हणाली.






