जळगाव, 29 ऑक्टोबर : महाराष्ट्र पोलीस दलातील 2024-25 च्या भरती प्रक्रियेसाठी मंत्रीमंडळाची नुकतीच मान्यता मिळाली होती. यानुसार, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील एकूण 171 रिक्त जागांसाठी भरती होणार असून याबाबतची अधिकृत जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात 171 पदांसाठी पोलीस भरती –
महाराष्ट्रात 15 हजार 631 रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून मंत्रीमंडळाने नुकतीच या भरतीला मान्यता दिली होती. यानुसार, जळगाव जिल्ह्यातही पोलीस शिपाई संवर्गात 171 पदांसाठी भरती होणार असून पोलीस शिपाई पद भरतीची सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org तसेच http://www.mahapolice.gov.in या दोन संकेतस्थळांवर उमेदवारांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत –
महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यास आज 29 ऑक्टोबर बुधवारपासून सुरूवात झाली असून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
पोलीस भरती कशी होईल अंतिम निवड? –
राज्य पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उमेदवारांना दोन टप्प्यांत परीक्षा द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात 100 गुणांची लेखी परीक्षा पार पडेल. शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारच पुढील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. त्यानंतरच्या लेखी परीक्षेतही किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक असेल. तसेच शेवटी दोन्ही टप्प्यांतील गुण — म्हणजे एकूण 150 गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.
जळगाव पोलिसांचे महत्वाचे आवाहन –
जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव यांना दुरध्वनी क्रमांक 0257-2235477 वर त्वरीत संपर्क साधून तक्रार करावी. तसेच, या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष, पोलीस भरती समिती-2024-2025 तथा पोलीस अधीक्षक, जळगांव यांच्याशी संपर्क साधून तक्रार करु शकतील, उमेदवारांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’, लाभार्थी महिलांना मंत्री आदिती तटकरे यांचे ई-केवायसीबाबत महत्वाचे आवाहन
 
			 
					





