चाळीसगाव, 17 जुलै : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अघोरी विद्या करत गुप्तधन शोधण्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी अघोरी विद्या करत गुप्तधन शोधणाऱ्या या टोळीचा केला पर्दाफाश केला आहे.
नागद रोडवर असलेल्या शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार सुरू होता. मात्र, अघोरी विद्येचा हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला आहे. तसेच आषाढी अमावस्या निमित्त जादूटोणा करून गुप्तधन शोधणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबतच घटनास्थळावरून मानवी खोपडी आणि इतर अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी अमावस्या असल्याने शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला आणि या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नागद रोडवरील एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, जादूटोणा करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये 2 मांत्रिकांचा समावेश आहे. तसेच घटनास्थळावरून मानवी खोपडी व इतर अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
या टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे आणखी इतर कोणकोणत्या ठिकाणी केले आहेत किंवा आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहे, अशी माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.