ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – सहाय्यक फौजदार (ASI) देवेंद्र मोतीराम दातीर हे 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. यानंतर त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्या लेकीने दिलेल्या भेटवस्तूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
देवेंद्र दातीर यांची मुलगी वैष्णवी हिने आपल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी एक अनोखी भेट दिली. वैष्णवी ही रंगश्री आर्ट फाऊंडेशनची कलेच्या क्षेत्रातील विद्यार्थिनी आहे. तिने आपल्या वडिलांना सेवानिवृत्तीच्या दिवशी तिच्या हाताने काढलेले त्यांचे चित्र भेट दिले.
वैष्णवीने आपल्या वडिलांचे चित्र 9 ते 10 तास मेहनत घेऊन अगदी हुबेहूब साकार केले. लेकीने तयार केले चित्र पाहून यावेळी तिचे आई-बाबांना गहिवरुन आले होते. मुलीकडून पित्याला मिळालेली ही अनोखी भेट मिळाल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला.
दरम्यान, वैष्णवीने आतापर्यंत पेन्सिल शेडींग, कलरपेन्सिल, जलरंग, ओपेक कलरच्या माध्यमातून बरीच चित्र काढली आहेत. त्यात गणपती बाप्पा, राधाकृष्ण, तुळजाभवानीच्या चित्रांचा समावेश आहे. दरम्यान, हे सर्व चित्र काढताना सुबोध कांतायन सर यांचे मार्गदर्शन लाभते.
या सोहळ्याला यांची होती उपस्थिती –
दरम्यान, या सेवानिवृत्ती सोहळ्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पाचोऱ्याचे पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरिक्षक अशोक पवार, पोलीस निरिक्षक मुरलीधर कासार (जामनेर), पोलीस निरिक्षक सचिन सानप (पहूर) तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, भडगाव येथील सौ. र. ना. देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एन . गायकवाड यांनी तसेच इतर मान्यवरांनी त्यांच्याबद्दल खूपच सुंदर विचारही मांडले.