चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 12 जानेवारी : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी युती-आघाड्यांची समीकरणे स्थानिक राजकारणानुसार बदलताना दिसत आहेत. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गणितांनुसार युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
जळगाव-धुळ्यात युती-आघाड्यांची रचना वेगळी –
खान्देश विभागातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांपैकी जळगाव व धुळे येथे महानगरपालिका अस्तित्वात आहेत. या दोन्ही शहरांमध्ये युती-आघाड्यांची रचना वेगळी असून, त्यामुळे निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. विशेषतः सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या आघाड्यांमधील थेट लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महानगरपालिका –
जळगाव महानगरपालिकेत त्रिकोणी राजकीय लढत पाहायला मिळत आहे. येथे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती झाली आहे. या युतीच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची आघाडी उभी आहे. तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करून स्वतंत्र आघाडी तयार केली आहे. त्यामुळे जळगावमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीचा असा तिहेरी सामना होण्याची शक्यता आहे.
धुळे महानगरपालिका –
धुळे महानगरपालिकेत मात्र चित्र अधिक गुंतागुंतीचे आहे. येथे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची काही प्रभागांमध्ये युती असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दुसरीकडे उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि मनसे यांनी संयुक्त आघाडी उभारली आहे. याशिवाय एमआयएम, बसपा, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महानगरपालिकांचे राजकीय चित्र 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार –
एकूणच जळगाव आणि धुळे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. स्थानिक प्रश्न, प्रभागनिहाय उमेदवारांची ताकद आणि युती-आघाड्यांचे गणित यावर निकाल अवलंबून राहणार असून, 15 जानेवारीनंतर खान्देशातील महानगरपालिकांचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.






