मुंबई, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कार्यक्रम तसेच दौऱ्यांच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर येत असतात. यातच आता उद्या 1 मे रोजी प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार आहे. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतून ही परिषद साकार होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत –
विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
काय आहे वेव्हज 2025 परिषद –
केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.
हेही वाचा – पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती