(शिरसोली), जळगाव, 3 जून : जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे घटना ताज्या असताना शिरसोली येथून मोठी बातमी समोर आली आहे. टेलिग्रामवर फेक आयडी तयार करून पैशाचे आमिष दाखवत शिरसोलीच्या 27 वर्षीय युवकाची 5 लाखांमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, टेलिग्राम या सोशल मीडिया अॅपवर फेक आयडी तयार करून त्यात वेळोवेळी टास्क देत त्याव्दारे पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यातून शिरसोलीच्या 27 वर्षीय युवकाची 5 लाखांमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून दिव्या बस्सी व प्रिया शर्मा नामक युवतीवर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दिलीप लांबोळे असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
टेलीग्रामवर दाखवले पैशाचे आमिष –
शिरसोली येथील शुभमला 28 व 29 मे दरम्यान व्हॉट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असे नाव सांगणाऱ्या युवतीने संदेश पाठवून संपर्क केला. यानंतर दिव्या बस्सी नामक युवतीनेही शुभमला वारंवार संपर्क करत त्याचा विश्वास संपादन करून त्याला वेगवेगळे टास्क पूर्ण करायला लावले. या टास्कमध्ये जर पैसे गुंतवले तर अधिकचा नफा होईल, असे आमिष त्याला दाखविण्यात आले.
अन् तरूणाची झाली पाच लाखात फसवणूक –
शुभमने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एकूण 5 लाख 23 हजार रुपयांची रक्कम त्यात भरली. मात्र, त्यात झालेल्या नफ्याची रक्कम शुभमला शेवटी मिळालीच नाही आणि यातून 5 लाख 23 हजार रुपयांपैकी केवळ 2800 रुपयेच शुभमला मिळाले. दरम्यान, संपर्क साधूनही रक्कम मिळत नसल्याने काही वेळेनंतर हे अकाऊंट व फोन नंबर बंद झाले. शुभमला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने जळगावातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : खान्देशात कोण मारणार बाजी? वाचा, ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा लोकसभा निवडणूक निकाल स्पेशल रिपोर्ट