भडगाव, 4 जून : धुळ्यातील सैन्य दलात जवान असलेल्या पतीने विवाह बाह्य संबधांत अडसर ठरत असल्याने आपल्या पत्नीला इंजेक्शन देऊन ठार मारले. शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यातील माहेर असलेल्या शारदा बागुल या महिलेच्या हत्येमुळे संतापाची लाट उसळली असून या हत्येच्या निषेधार्थ 6 जून रोजी आक्रोश मोर्चा निघणार आहे.
भडगावात निघणार 6 जून रोजी आक्रोश मोर्चा –
भडगाव तालुक्यातील माहेरवाशीण शारदा उर्फ पूजा बागुल (माळी) हिच्यावर 29 मे रोजी पतीसह इतर संशयितांनी धुळे येथे अनन्वित अत्याचार करत अमानुष मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण भडगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी व पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी शुक्रवार, 6 जून रोजी सकाळी 9 वाजता भडगाव नगरपरिषद जवळील बाजार चौक येथून ते तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जावी. आरोपीसह इतरांना फाशी दिली पाहिजे, अशा आशायाच्या मागणीचे निवदेन यावेळी देण्यात येणार आहे.
मोर्चाच्या नियोजनासाठी भडगावात पार पडली बैठक –
भडगाव येथील माहेरवाशीण स्व. शारदा बागुल हिच्या तिच्या पती इतर सहकाऱ्यांकडून झालेल्या निघृण हत्येच्या निषेधार्थ भडगाव शहरातील सर्व समाज मंडळ व संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे काल 3 जून रोजी दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या सर्व समाज मंडळ अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह इतर नागरिक उपस्थित होते. आणि या बैठकीत दि. 6 रोजी भडगाव येथे आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले.
पूजा बागुल हत्या प्रकरण –
धुळ्यातील सैन्य दलात जवान असलेल्या पतीने आपल्या पत्नीला इंजेक्शन देऊन ठार मारले विवाह बाह्य संबधांत अडसर ठरत असल्याने पत्नीला ठार केले. याप्रकरणी तिच्या सैन्य दलातील जवान पती कपिल बाळू बागुल, पतीची प्रेयसी सह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली असून शवविच्छेदन अहवालातही विषप्रयोग आणि डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : महिलांच्या हक्कांसाठी राज्य महिला आयोग दक्ष – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे