भुसावळ, 16 ऑगस्ट : बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर तेथील बहुसंख्य समाजाकडून प्रचंड अत्याचार होत आहेत. या अत्याचाराचा निषेधार्थ भुसावळमधील सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मूक मोर्चाचे आज 16 ऑगस्ट रोजी ओयजन करण्यात आले. आज सकाळी 10 वाजता भुसावळातील अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून हा मोर्चा निघाला. यावेळी हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
भव्य निषेध मूक मोर्चा –
भुसावळ शहरातील अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड, ब्राह्मण संघ, मरी माता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, गांधी चौक, अमर स्टोअर्स, बाजारपेठ पोलीस स्टेशन, लोखंडी पूल, गुजराती स्वीट, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळा, जळगाव रोड, प्रभाकर हॉल समोरील प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. भाजी बाजार डेली मार्केट, सर्व दुकाने बंद राहिली. शैक्षणिक शाळा आणि महा विद्यालये आणि वकील संघाने काळया फिती लावून निषेध नोंदविला. न्यायालयातही पक्षकारांचा शुकशुकाट पाहायला मिळाला.
निषेध मोर्चाचे लेखी निवेदन –
मोर्चाच्या अग्रस्थानी निषेध फलक, राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज, चार रांगेत मोर्चात सहभागी हजारो लोकांची उपस्थिती होती. मोर्चात कुठल्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. 4-4 च्या रांगेत एक हाताचे अंतर होते. हा मोर्चा प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर निषेध मोर्चाचे लेखी निवेदन या मोर्चाचे नेतृत्व करणारे सर्व साधू संत धर्मगुरू ,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.
निवेदन ‘या’ आहेत मागण्या –
निषेध मोर्चानंतर दिलेल्या लेखी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक समुदायावर प्रचंड अत्याचार होत आहेत. त्यांच्या सुरक्षेतेसाठी ताबडतोब पाऊल उचलावी, भयावह स्थिती व असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी भारताच्या सीमेजवळ जमा झालेल्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी छावण्या सुरू कराव्यात. गेल्या काही दिवसांपासून भारतात सुद्धा घडलेल्या काही घटना पाहिल्यास असे दिसून येते की, असा काही हैदोस जिहादी माजवण्याच्या प्रयत्नात आहेत. अरविंद वैश्य आणि यशश्री शिंदे ही त्याची उदाहरणे आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी कठोर कायदा व्हावा. आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन मोर्चातील नागरिकांच्या भावना सरकार पर्यंत पोहचवणार असल्याची ग्वाही दिली. उपस्थित संतांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.
मोर्चात यांची होती उपस्थिती –
सदर मोर्चात बक्षो गुरुदासराम जग्यासी, स्वामी ब्रह्मानंद (दत्त गिरणारी मठ), रासयात्रादास (इस्कॉन), धर्मस्वरूप स्वामीजी शास्त्री, ह. भ. प. धनराज महाराज अंजाळेकर, प्रभाकर शास्त्री (चक्रधर मंदिर), गोटू गोरवाडकर गुरुजी, अमृत रामदास जग्यासी, बालयोगी महामंडलेश्वर गेंदालाल बाबा, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, अर्जुनसिंगजी महाराज (शीख समाज धर्म गुरू), माधवस्वामी शास्त्री, भक्तीश्रीजी महाराज, सुमनतीस भंतेजी, अंगुलीमाल भांतेजी, शामरन भंतेजी यांच्यासह विविध सांप्रदायांचे धर्मगुरू साधुसंत, व्यापारी, सराफ असोसिएशन, हॉटेल चालक, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यवसायीक, युवक- युवती, श्री गणेश व नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते , शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.






