नांदेड, 26 एप्रिल : एका घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला रक्ताची आवश्यकता होती. ही माहिती कळाल्यावर जिल्हा विशेष शाखेतील उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी तत्परतेने पुढाकार घेत या जखमी मुलासाठी रक्तदान करुन जीवदान दिले. दरम्यान, त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मुदखेड तालुक्यातील मौजे कामळज येथील रहिवासी ऋषिकेश खानसोळे (वय 15) हा शेतातील ट्रॅक्टरद्वारे रोटारेटरचे काम करीत असताना त्याचा पाय रोटरेटरमध्ये गेला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होवून तो गंभीर जखमी झाला. त्याला ओम हॉस्पिटल नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला रक्ताची नितांत आवश्यकता होती. हे कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी तात्परता दाखवत जिजाऊ रक्तपेढी गाठून तेथे ए निगेटिव्ह गटाचे रक्त गरजू ऋषीकेशसाठी दिले.
या रक्तदानाबद्दल गुंडे यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. यापुर्वी देखील उपनिरीक्षक अमोल गुंडे हे लातूर येथे कार्यरत असताना अपघातातील जखमीस रक्ताची आवश्यकता होती. हे कळाल्यावर त्यांनी लगेच रक्तदान करून संबंधीत जखमीला जीवदान दिले होते. याबाबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख त्यांचे ट्विटरद्वारे कौतुक केले होते.
रक्ताचा तुटवडा कायम –
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्येही फारसा रक्तसाठा उपलब्ध नाही. विशेषतः निगेटिव्ह रक्त गटाचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगातील गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्याचे आव्हान रक्तपेढ्यांसमोर उभे टाकले आहे.
हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला