जालना, 18 एप्रिल : चोपड्यातील बसस्थानकावर चोरी करणाऱ्या जालन्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. प्रल्हाद पिराजी मांटे (58, रा.जालना)असे त्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती जालन्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
चोपडा बस स्थानकामध्ये बसमध्ये चढतांना एका 76 वर्षीय वृद्धाची 65000/- रुपये किमतीची रक्कम खिशातुन चोरी केल्याची घटना 16 एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर सदर आरोपीतांनी बस स्टँड परिसरातुन पळ काढला होता. याप्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी सापळा रचत प्रल्हाद पिराजी मांटे याच्यासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली.
जालन्याच्या एसपींनी दिली माहिती –
तसेच चोरीच्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेला प्रल्हाद पिराजी मान्टे हा जालना पोलीस दलामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असल्याचे सदर तपासात निष्पन्न झाले. यासोबतच आधीपासून विविध ठिकाणी चोऱ्या करण्यांमध्ये मांटेचा सहभाग असल्याचे तपासातून बाहेर आले. दरम्यान, चोरी प्रकरणी चोपड्यात गुन्हा दाखल करत मांटे याला अटक झाल्याने त्याला पोलीस उपनिरीक्षक पदावरून निलंबित केल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.