पुणे : पुण्यातील एका आयटी तरुणाने आपल्या पत्नीची हत्या करुन सुटकेसमध्ये भरल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. गौरी अनिल सांबरेकर असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपी पती राकेश हा बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी गौरी अनिल सांबरेकर ही जनसंज्ञापन या विषयात पदवीधर होती. तसेच ती सध्या नोकरीच्या शोधात होती. महिन्याभरापूर्वीच ते बंगळुरू येथील घरात राहायला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले.
क्षुल्लक कारणावरुन त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर तो पुण्याला पळून आला. यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याला 24 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली.
आरोपी राकेश हा 36 वर्षांचा आहे. तर त्याची पत्नी गौरी ही 32 वर्षांची होती. गौरीने यापूर्वी एका खासगी कंपनीत काम केले होते, परंतु अलीकडेच तिने नोकरी सोडली होती आणि ती नवीन नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवून बाथरूममध्ये लपवून ठेवला.
हत्येनंतर घरमालकास केला फोन –
रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने आपल्या घरमालकाला फोन केला आणि फोन करुन सांगितले की मी माझ्या पत्नीची काल रात्री हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन ठेवलाय. तुम्ही तिचा मृतदेह बाहेर काढा आणि तिच्या कुटुंबीयांना कळवा, तिच्या अंत्यसंस्काराची तुम्ही व्यवस्था करा.
दरम्यान, पुण्यातल्या आयटी तरुणाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.