चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
परभणी, 31 मार्च : हवामानविषयक अंदाज सांगणारे आणि त्या अंदाजामुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे परिचित असलेले पंजाबराव डख यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज खरा ठरविणाऱ्या पंजाबराव डख यांचा विजयाचा अंदाज खरा ठरणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काय संपूर्ण बातमी? –
हवामानविषयक माहिती देत शेतकऱ्यांच्या मते अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. पंजाबराव डख यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे परभणी मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोण आहेत पंजाबराव डख –
पंजाबराव डख हे हवामानाविषयक माहिती देण्यासाठी परिचित आहेत. पंजाबराव डख हे शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी, हवामान काय असू शकते याबाबतची माहिती देत असतात. यासाठी ते त्यांच्या समाजमाध्यमांचा वापर करत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवित असतात. तसेच बदलत्या हवामानाबाबत ते नवनवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत असतात. दरम्यान, महाराष्ट्रात पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाच्या अंदाजावर अनेक शेतकरी- नागरिक विश्वास ठेवतात. यामुळे डख हे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघ –
परभणी लोकसभा मतदारसंघात सध्यास्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव विद्यमान खासदार आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्याने ते पुन्हा एकदा खासदारकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे रासपचे महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून संजय जाधव यांच्याविरोधात त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्या दोघांच्या लढतीत आता पंजाबराव डख यांनी उडी घेतली. पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढणार असून त्या अनुषंगाने त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे.
हेही वाचा : काल, आमदारकीचा राजीनामा आणि आज थेट मिळाले लोकसभेचे तिकीट, निलेश लंके सुजय विखेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात