नंदुरबार, 12 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेने आज दुपारी महाराष्ट्रात प्रवेश केला. यावेळी नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. आम्ही सत्तेत आल्यास जातीय जनगणना करू, अशी हमी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले राहुल गांधी? –
देशातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम अर्थात मनरेगा योजनेचे वार्षिक बजेट हे 65 हजार कोटी रुपयांचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी 24 वर्षांच्या मनरेगा योजनेचे पैसे एकत्रित करुन जितकी रक्कम होईल, तेवढ्या रुपयांचे अब्जाधीश उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
नंदुरबार येथील सभेत राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही 8 टक्के इतकी आहे. तितक्या प्रमाणात आदिवासी समाजाला देशातील सरकारी संस्था, सरकार, खासगी रुग्णालये, प्रशासनात प्रतिनिधित्व मिळत आहे का, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
जातीय जणगणना आवश्यक –
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातीय जनगणना करणे आवश्यक असून हाच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा असेल. देशातील आदिवासी, दलित आणि मागास जातींना ‘दुखापत’ झाली आहे, त्यासाठी एक्स-रे, एमआरआय करण्याची गरज आहे. तीच गरज जातीय जनगणनेच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.
हेही वाचा : राज ठाकरेंना मोठा धक्का, वसंत मोरे यांनी मनसेला केला अखेरचा जय महाराष्ट्र, काय आहे कारण?