जळगाव, 20 ऑक्टोबर : परतीच्या पावसाचा शेतीपिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना काल शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात ‘या’ भागात येलो अलर्ट –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात आज ‘यलो अलर्ट’ असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असता, वातावरणात बदल जाणवत आहे. यामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाल्यानंतर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता –
मुंबईसह कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच हा आठवडाभर पावसाचा अंदाज कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाचोरा शिवारात अतिवृष्टीची नोंद –
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवार रोजी जोरदार पाऊस झाला. यामध्ये पाचोऱ्यात सर्वाधिक 59.5 मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, यामुळे पाचोरा शिवारात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात शुक्रवार रोजी झालेल्या परतीच्या पावसामुळे बहुतांश भागात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे कापसाला भाव मिळत नसताना परतीच्या पावसामुळे पिकांचे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात दुपार किंवा संध्याकाळपर्यंत गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव आर्थिक मदतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन