जळगाव, 17 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने अखेर जळगाव जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी –
गेल्या 20 ते 25 दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भाग पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हलक्या रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर शनिवारी रात्री पावसाने जोर धरला आणि अनेक तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली.
जळगाव तसेच पाचोरा, भडगाव, धरणगाव, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस बरसला. धरणगाव तालुक्यातील सतखेडा परिसरात शेतात पाणी साचल्याने संपुर्ण शेत पाण्याखाली गेल्याचे समजते. पारोळा तालुक्यातील शेळावे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती प्राप्त झालीय.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काही भागांत अतिवृष्टीमुळे नुकसानही झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे.
जळगाव जिल्हाचा हवामान अंदाज नेमका काय? –
बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात ढगावळ वातावरण राहणार असून आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे.