मुंबई, 27 जुलै : विशेष सरकारी वकील, जळगावचे सुपूत्र पद्मश्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी तीन दिवसांपूर्वी 24 जुलै रोजी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, त्यांच्या शपथविधीपूर्वी नुकतीच सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यासोबतच त्यांनी या विशेष मुलाखतीत त्यांनी जळगावकरांना खास असा संदेशही दिला.
या विशेष मुलाखतीत राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम म्हणाले की, जळगावच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. जळगाव हे माझं जन्मस्थान आहे. कारण आजही मला लोक जळगावचा म्हणून ओळखतात. ज्यावेळी मी 1993 मध्ये जळगावहून मुंबईला आलो, त्यावेळी मला मुंबई फारसं काही माहिती नव्हतं. वकील असूनही त्यावेळी मला मुंबईतील पोलीस आयुक्त, न्यायालय माहिती नव्हतं. कारण यायचा संबंध नव्हता. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा मुंबईकरांचा दृष्टीकोन हा एक खेड्यातला माणूस याठिकाणी आलेला आहे, असा होता.
जळगाव हे काही खेडं नाही. पण मुंबईसारख्या मुंबईकरांना बाकीची शहरं ही खेडी वाटायची. पण आता त्यांना तसं वाटत नाही. म्हणून जळगावचा मला सार्थ अभिमान आहे. आमचं सर्व कुटूंब हे जळगावचं आहे. त्यामुळे माझी आजही ओळख ही जळगावकर आहे.
राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा जळगावकरांना खास संदेश –
या विशेष मुलाखत बोलताना पुढे ते म्हणाले की, माझ्या जळगावकरांना एकच संदेश आहे की, आपण कुठे राहतो याला महत्त्व नाही. आपण आपल्या मातीची नाळ कायम जोडली पाहिजे. तुमच्यावर मनात संस्कार काय आहेत, हे तुमच्या लहानपणातच कोरले जातात. म्हणून जन्मस्थळ हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून जळगावकरांना माझी विनंती आहे की, आपण आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. लहान मुलांमध्ये मैत्रीचा संबंध निर्माण केला पाहिजे. केवळ बाप आणि मुलगा असं कडक शिस्तीचं वातावरण नको. बाप आणि मुलात मैत्रीचे, मित्रत्त्वाचे संबंध असले पाहिजेत, हे जळगावकर लक्षात ठेवतील, मला खात्री आहे. तसेच केव्हाही, कुठेही काहीही अडचण असेल, मी कुठेही असलो तरी आपल्या कुठल्याही म्हणण्याला मी दाद देईन. याची खात्री बाळगा, असा विश्वासही त्यांनी यावेळी जळगावकरांना दिला.
उज्ज्वल निकम यांचा आज जळगावात नागरी सत्कार –
दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आज त्यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी 5 वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर, जळगाव याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून, अॅड. उज्वल निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.