जळगाव, 22 फेब्रुवारी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते (शरद पवार गट) एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ठ केले असतानाच त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनी यावर विधान केले आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे? –
भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. एकनाथ खडसेंनीही भाजपात यावे, ही सर्वांची इच्छा असून एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे. आगामी काळात काय होते हे सर्व घडल्यानंतरच कळेल, जशी लोकांची इच्छा आहे तशी माझीही इच्छा आहे की नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
भाजप प्रवेशावर एकनाथ खडसे काय म्हणाले? –
मागील आठवड्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ट्विट करत भाजप प्रवेशाबद्दल त्यांची भूमिका मांडली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, गेले काही दिवसांपासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतुने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : बारावीच्या परीक्षेत बहिणीला कॉपी पुरविण्यासाठी बनला तोतया पोलिस अन्……