संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 27 जुलै : सन 2023 मधील पिक विमा योजनेचे लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे दोन तास चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन –
स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांनी काल सकाळी 11 वाजता पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर चक्क दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल दोन तासाच्या आंदोलनात वाहनांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे –
आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे 15 कोटी रूपये येतील. शासनाचा जीआर मंजुर झाल्यानंतर सरकारकडून पैसे आल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येईल, असे आश्वासन पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी जिल्हा तसेच तालुका प्रशासनाच्यावतीने उपस्थित शेतकऱ्यांना केले. तसेच शेतकरी संघाच्या मागण्यांचे निवदेनाची दखल त्या मागण्यांचा शासनापर्यंत पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होण्यासाठी आंदोलन –
नैसर्गिक आपत्ती विषयी आणि सतत होणाऱ्या पिक विमा कंपनीच्याद्वारे पिळवणूक यामुळे हवालदिल झालेला शेतकरी विविध प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याचे शेतकरी संघटनेकडून आंदोलनावेळी सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील आंदोलनकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी मते व्यक्त करतांना सांगितले की, मागील वर्षी खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, कापूस यांच्या अतोनात नुकसान झाले. शेतकरी संघटनेने लगेच तत्परता दाखवून पिक विमा कंपनीचे संपर्क साधला आणि पंचनामा करायला लावला. 15 जूनपर्यंत शेतकरी विमा हप्ता भरण्याची मुदत होती. मात्र, एक वर्ष उलटून गेलं तरी अजून आपल्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत. फक्त एक हेक्टरी पंचवीसशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आले. 100 टक्केची विमा जोखीम आहे तर आम्हाला 70 टक्के ते 75 टक्के विमा नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा –
गेल्या वर्षाच्या पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडत उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर या मागण्याशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी निवेदने देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. यावेळी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांच्यासह सरकारी सेवेतील कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती