चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
तारखेडा (पाचोरा), 12 मार्च : जर आपल्या मनात एखादे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि त्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे हार न मानता सातत्याने कठोर परिश्रम जर केले, तर व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करू शकतो, हे पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. पाचोरा तालुक्यातील रविंद्र कुंभार आता सरकारी शिक्षक झाला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील रविंद्र कुंभार या तरुणाची आता सरकारी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्र कुंभार हा तरुण आधी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात नोकरी करत होता. मात्र, विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे त्याचा कल होता. त्याने याआधी काही काळ खासगी शिकवणीमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत असताना शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आधीपासून शिक्षक होण्याचे त्याचे स्वप्न होते. आता त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे त्याने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला यानंतर आज तो जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मोंढाळे येथे रुजू झाला.
अशी झाली निवड प्रक्रिया –
महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल 2022च्या माध्यमातून साधारणत: 21 हजार पदांची शिक्षक भरतीची जाहिरात निघाली होती. यानंतर 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये रविद्र कुंभार याने 200 पैकी 144 गुण मिळवले होते. राज्यभरातील एकूण 2 लाखांच्या वर उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. यामध्ये गुणवत्ता यादीत रविंद्र कुंभार या तरुणाने पदवीधर शिक्षक (गणित-विज्ञान) या गटात आपले स्थान निश्चित केले. यानंतर आता त्याची जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मोंढाळे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारी शिक्षकपदी निवड झाल्यावर काय होती भावना? –
रविंद्र कुंभार या तरुणाची सरकारी शिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज’ने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज‘सोबत बोलताना रविंद्र म्हणाला की, माझ्या या यशामागे माझे आई वडील, माझे मोठे भाऊ आणि माझी पत्नी यांची मोठी भूमिका राहिली. त्यांना मला सतत अभ्यासाठी प्रेरित केले. आधी मी केंद्र सरकारमध्ये रेल्वेची नोकरी करत होतो. पण ती नोकरी करत असताना माझी मूळ आवड ही शिक्षणाकडेच राहिली. त्यामुळे मी नोकरी करत असताना यासाठी अभ्यासही केला आणि ही परीक्षा दिली.
यामध्ये माझी निवड झाल्यानंतर मला आता खूप आनंद होत आहे की, मला माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणार आहे. मी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात नोकरी करण्याआधी अभ्यास करत होतो. मात्र, त्यादरम्यान, माझ्या शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून मी काही काळ क्लासेसही घेतले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शनही केले. मी आता यानंतरही माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी कटीबद्ध असेन, अशी प्रतिक्रिया त्याने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज’सोबत बोलताना दिली.
रविंद्र कुंभार कुंभार या तरुणाचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील या शाळेत घेतले. तर बारावी आणि नंतर बीएस्सीपर्यंतचे शिक्षण हे पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात घेतले. यानंतर एमएस्सीचे शिक्षण हे जळगाव येथील एम. जे. कॉलेज येथून पूर्ण केले. त्याच्या या निवडीनंतर त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा : Nandurbar : सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी, महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींचे आश्वासन