बेंगळुरू (कर्नाटक) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने IPL 2025 च्या आधी मोठी घोषणा केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या कर्णधारपदी रजत पाटीदारची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता तीन हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसकडून आरसीबीचे नेतृत्त्व हे रजत पाटीदारकडे आले आहे.
आयपीएल 2021 मध्ये दुखापतीचा बदली खेळाडू म्हणून आरसीबीमध्ये आलेल्या पाटीदारने 27 सामन्यांमध्ये 158.85 च्या शानदार स्ट्राइक रेटने 799 धावा केल्या आहेत. आयपीएल 2024 हा रजतसाठी विशेषतः विलक्षण हंगाम होता. यामध्ये त्याने 15 सामन्यांत 177.13 च्या स्ट्राइक रेटने पाच अर्धशतकांसह 395 धावा केल्या.
विराट कोहली आणि यश दयाल यांच्या व्यतिरिक्त रजत पाटीदार हा आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी एक स्टार खेळाडू होता. त्याला 11 कोटी रुपयात कायम ठेवण्यात आले होते.
“रजतमध्ये साधेपणा आहे, त्याच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी आहे, त्याने मध्य प्रदेशचे नेतृत्व कसे केले ते आम्ही जवळून पाहिले आहे, आम्हाला ते खूप आवडले,” असे आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले.
दरम्यान, पाटीदार आता भूतकाळातील आरसीबीच्या कर्णधारांच्या स्टार-स्टडेड यादीत सामील झाला आहे. यामध्ये राहुल द्रविड, शेन वॉटसन, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, डॅनियल व्हिटोरी, फाफ डू प्लेसिस आणि कोहली यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : बुमराह आऊट, कुणाला मिळाली संधी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर