चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांचा सभा पार पडल्या. दरम्यान, काल सायंकाळी 18 नोव्हेंबर रोजी प्रचारतोफा थंडावल्या असून उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमधील लढती जाणून घेऊयात.
जळगाव शहर मतदारसंघ –
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री महाजन निवडणुकीच्या लढवत आहेत. तसेच डॉ. आश्विन सोनवणे, मयुर कापसे, कुलभूषण पाटील या अपक्ष उमेदवारांसोबतच डॉ. अनुज पाटील, ललित घोगले हे उमेदवार देखील निवडणुकीत नशीब आजमवत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना या विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी विजय मिळवला तर 1962 नंतर महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्या करू शकतात.
जळगाव ग्रामीण मतदारसंघ –
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले गुलाबराव पाटील हे 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत निवडून येत सलग दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. याआधी 1999 आणि 2004 साली निवडून आले होते. तसेच 2009 च्या निवडणुकीत त्यांच्याविरोधातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गुलाबराव देवकर अशी थेट लढत असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघ –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत या मतदारसंघात किशोर पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने बहिण विरूद्ध भाऊ अशी लढत याठिकाणी आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, डॉ. निलकंठ पाटील तसेच महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून प्रतापराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
चाळीसगाव मतदारसंघ –
2014 ते 2019 अशी पाच वर्षे उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यानंतर ते 2019 साली लोकसभा खासदार झाले. मात्र, 2024 साली त्यांचे खासदारकीचे तिकीट कापल्याने ते ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. असे असताना ते पुन्हा चाळीसगावात आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे पहिल्याच टर्ममध्ये 2019 साली निवडून आलेले भाजपचे मंगेश चव्हाण हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता ते दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, एकेकाळी मित्र असलेले उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण हे आता विधानसभा निवडणुकीत कट्टर विरोधक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगेश चव्हाण विरूद्ध उन्मेश पाटील अशी थेट लढत याठिकाणी असल्याने जनतेचा कौल कोणाला मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
चोपडा मतदारसंघ –
चोपडा विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे आमदार म्हणून प्रथमतः निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे एकेकाळी भाजपमध्ये असलेले प्रभाकर सोनवणे ह्यांनी 2019 साली अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना लताताई सोनवणे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले होते. आणि आता त्यांना शिवसेनना ठाकरे गटाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार असल्याने हा मतदारसंघ देखील लक्षवेधी ठरणार आहे.
रावेर मतदारसंघ –
रावेर यावल विधानसभा मतदारसघांत विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातेए. तर दुसरीकडे भाजपच्यावतीने दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांचे पूत्र अमोल जावळे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शमिभा पाटील हे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच रावेरचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते दारा मोहम्मद यांनी बंडखोरी केली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी पंचरंग लढत होणार आहे. यात कोणी बाजी मारणार, हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल.
जामनेर मतदारसंघ –
जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. जामनेरमध्ये 1995 सालापासून ते निवडून येत असून आतापर्यंत त्यांनी तब्बल 6 वेळा विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधात एकेकाळी भाजपचे पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. गिरीश महाजन विरूद्ध दिलीप खोडपे अशी थेट लढत असल्याने याठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एरंडोल पारोळा मतदारसंघ –
एरंडोल पारोळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान, या मतदारसंघात महाविकास आघाडी तसेच महायुतीत बंडखोरी झाल्याने माजी खासदार ए. टी. पाटील, ठाकरे गटाचे डॉ. हर्षल माने व भगवान महाजन यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
अमळनेर मतदारसंघ –
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा कॅबिनेट मंत्री अनिल पाटील हे 2019 पासून प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, यासोबतच याठिकाणी बंडखोरी झाली असून माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने याठिकाणी काट्याची लढत पाहायला मिळणार आहे.
भुसावळ मतदारसंघ –
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील राखीव मतदारसंघ असून याठिकाणी भाजपने सलग दहा वर्षांपासून विद्यमान आमदार संजय सावकारे हे प्रतिनिधित्व करत आहेत. संजय सावकारे यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचे आव्हान असणार आहे. भाजपकडून संजय सावकारे तर काँग्रेसकडून डॉ. राजेश मानवतकर अशी थेट लढत याठिकाणी असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघ –
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चंद्रकांत पाटील हे करत आहेत. ते 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. आता या निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्याविरोधात सामना रंगणार आहे. 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अवघ्या 1957 मतांनी पराभव केला होता. याठिकाणी मनसेच्या वतीनेही उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणची ही लढाई आरपारची मानली जात आहे.
हेही पाहा : Video : प्रचारतोफा थंडावल्या; आता उत्सुकता मतदानाची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद