मुंबई, 17 एप्रिल : महायुती सरकारमधील नेत्यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना भावनिक आवाहन निवडणुकीच्या काळात केले. तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचे 1500 रूपयांचे मानधन हे वाढवून देऊ, असे आश्वासन दिले होते. अशा अनेक घोषणा करून मते तर मिळवले. मात्र, या लाडक्या बहिणी सरकारला परक्या झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींना खोटं आश्वासन देऊन यांनी मते मिळवली होती. या सर्व भूलथापा होत्या. म्हणून या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल केला गेलाच पाहिजे अन् आम्ही तो करणार, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खोटं आश्वासन देऊन त्यांच्याकडून मते मिळवून घेतली..अशा लाडक्या बहिणींना आम्ही जमा करून त्यांच्याकडून सरकारच्याविरोधात 420 चा गुन्हा नोंद करणार आहोत आणि आम्हाला खोटी आश्वासन देऊन तुम्ही आमची मते का मिळवली असा जाब देखील आम्ही सरकारला विचारणार असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.
सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप –
मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर मोठं बॅनर लावून सरकारने जनतेची फसवणुक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा करून तिची अंमलबजावणी करताना जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावेळी रोहिणी खडसेंसह पक्षातील महिला पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. दरम्यान, पोलिसांनी हे बॅनर काढण्याच्या सूचना दिल्यामुळे रोहिणी खडसे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून करण्यात येतय – रोहिणी खडसे
रोहिणी खडसे म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात सरकारकडून अनेक घोषणा जाहिरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या एकही घोषणांमधील एकही घोषणा सरकारने पुर्ण केलेली नाही. त्याविरोधात आम्ही एक बॅनर प्रसिद्ध करून सरकारविरोधात जाब विचारण्याचं काम करतोय. मात्र, विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. म्हणून पोलिसांकडून हे बॅनर काढण्याचे सांगितले जातेय. मात्र, आम्ही हे बॅनर काढू देणार नाही. कारण, सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची आठवण करून देणारं हे बॅनर आहे आणि आम्ही सरकारला आठवण करून देणारच, असे आव्हान रोहिणी खडसेंनी सरकारला दिले आहे.