जळगाव, 2 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी विभागणी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात जोरदार टीका केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकर यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या रोहिनी खडसे? –
रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणले आहे, असं वक्तव्य अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले होते. रूपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं, असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या रूपाली चाकणकर? –
अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.