चाळीसगाव, 9 एप्रिल : राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना चाळीसगाव तालुक्यात महावितरणच्यावतीने वीज बिले सक्तीने वसुली मोहीम सुरू असून तात्काळ वीज बिले वसुली बंद करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना 12 तास दिवसभर वीज पुरवठा करण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेच्या वतीने 8 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
शासनाच्या सूचनेनुसार दुष्काळाच्या परिस्थितीत चाळीसगाव तालुक्यात कुठलीही विज बिले वसुली सक्तीने करता येत नाही, असे असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करून महावितरण कंपनीकडून मनमानी पद्धतीने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर विज भरणा करण्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप रयत सेनेने केला आहे. दरम्यान, हा त्रास तात्काळ थांबवून विज पुरवठा सुरळीतपणे करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी शिरसगाव येथे शेतकरी दिलीप पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप पर्यंत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना 12 तास दिवसभर वीजपुरवठा सुरू केला नाही. तसेच ग्रामीण भागात सध्या कुठल्याही शेतमजुरांना कामे नाहीत त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे देखील वीज खंडित केली जात आहे.
दरम्यान, महावितरण कंपनीच्या मार्फत ग्रामीण भागात सुरू असलेले वीज बिले वसुली तात्काळ थांबवण्यात येऊन शेतकऱ्यांना व कष्टकरी जनतेला सुरळीतपणे वीज पुरवठा करण्यात यावा. अन्यथा शेतकऱ्यांसह रयत सेना चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण कंपनी व कार्यकारी अभियंता जबाबदार राहणार असल्याचे महावितरण चे सहाय्यक अभियंता यांना दि ८ रोजी रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शेतकरी दिलीप पाटील, रयत सेनेचे प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, शहरअध्यक्ष छोटू अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर सहसंघटक दीपक देशमुख, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, शहर संघटक शिवाजी गवळी, उमेश पवार, मंगेश देठे, प्रा. चंद्रकांत ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!