चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
एरंडोल (जळगाव), 12 मे : गावाला पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळावे आणि ग्रामपंचायच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळित राहण्यासाठी पाणीपुरवठा करणारे कर्मचारी सातत्याने प्रामाणिकपणे सेवा देतात. मात्र, याच पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार थकित असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील 10 महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेमकी बातमी काय? –
कामगार सेना 5825 चे एरंडोल तालुका अध्यक्ष प्रदीप तांगळे तालुकाध्यक्ष प्रदीप तांगळे म्हणाले की, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत (RGSA) ऑनलाईन पद्धतीने वेतन देण्यात येत होते. काही कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने वेतन बंद करण्यात आल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्यास सुरूवात झाली. मात्र, जवळपास मागील 10 महिन्यांपासून एरंडोल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही.
दरम्यान, यानंतर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. गेल्या 10 महिन्यांपासून आम्ही विना पगाराचं जीवन जगत असून विना पगाराचं जगायचं कसं, असा सवाल प्रदीप तांगळे यांनी उपस्थित केलाय.
यासोबतच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय रल यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ग्रामपंचायतच्या किमान 15 ते 17 पाणीपुरवठा कर्माचाऱ्यांचे वेतन थकित आहेत. यामुळे वेतन थकित असलेल्या कर्माचाऱ्यांचे शासनाने लवकरात लवकर वेतन मिळाले पाहिजे. यासोबतच जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्माचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन तात्काळ दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेकडे दिली आहे.
जिल्हा प्रशासनाची प्रतिक्रिया काय? –
एरंडोल तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार थकित असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्यावतीने जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. शासनाला मागणीपत्र पाठवण्यात आले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर थकित असलेल्या कर्माचाऱ्यांचे वेतन देण्यात येईल, असे यावेळी भाऊसाहेब अकलाडे म्हणाले.