मुंबई, 27 जुलै : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केलीय. दरम्यान, या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत अख्खा भारतीय जनता पार्टी म्हणजेच रेव्ह पार्टी अशी टीका केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, एकनाथ खडसेंच्या जावई यांच्या अटक प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाहीये. पण या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल किंवा कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिण्याऱ्यावर दारू पितो म्हणून अटक केली जाईल. काही होऊ शकतं. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा ही भाजपविरोधी लोकांना प्रतारित करण्यासाठीच काम करतेय.
गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे हे सरकारच्यविरोधात विशेषतः गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्यांसह बोलत आहेत आणि ठामपणे आपली बाजू मांडत आहेत. अशातच पुढील 24 तासांत ताबडतोब रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसे यांनी जे आरोप केले त्या आरोपांची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. दरम्यान, ही पार्टी ती पार्टी. तुमचं काय चाललंय मग? असा सवाल करत अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी अशी खोचक टीका राऊतांनी केली. तसेच एकनाथ खडसे हे गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर तुटून पडत आहेत, त्याची किंमत त्यांना आता मोजावी लागत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.
खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक –
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बूक करण्यात आले होते आणि यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती. या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाल्यानंतर या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी या फ्लॅटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आले असून पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्याचे समजते. दरम्यान, या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात