जळगाव, 26 सप्टेंबर : समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयाकडून एलईडी चित्ररथ जिल्ह्यात फिरणार आहे. या चित्ररथातून सामाजिक न्याय विभागांच्या महत्वाच्या योजनांची माहिती असलेले व्हिडीओ, यश कथा, योजनांचा अर्ज कसा करायचा, त्याला लागणारे कागदपत्र ही माहिती या एलईडी च्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. हा दृकश्राव्य रथ ज्या ज्या गावात जाईल तिथल्या लोकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना बघून समजून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview