मुंबई – अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर अद्यापही ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठे नेते पक्षाची साथ सोडत आहेत. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. यातच आता पुन्हा एकदा मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या मोठ्या आणि जुन्या महिला नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील जुन्या महिला नेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल यांनी ठाकरे गटाला रामराम केला आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज संध्याकाळी हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
कोण आहेत राजूल पटेल –
राजुल पटेल या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या होत्या. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेवक आहेत. तसेच राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. मात्र, आता त्यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर काय म्हणाल्या राजूल पटेल –
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजूल पटेल म्हणाल्या की, पक्षात मी 40 वर्षांपासून कार्यरत होते. आज मी जे काही आहे, ते पक्षामुळे आहे. पण कितीतरी नासके कार्यकर्ते असतात, ज्यांना आपल्यापासून जळण असते आणि माझ्या त्यांना कुठेतरी नायनाट करायचा असतो, म्हणून त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिंदे साहेबांनी अडीच वर्षात चांगल्याप्रकारे कामे केली आहेत. लोकांना खूप चांगल्याप्रकारे मदत केली आहे आणि त्यांच्यासोबत माझ्या विभागाचा विकास करू शकेन, ज्या समस्या आहेत, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळेल, मी याठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे त्यांनी सांगितले.