सांबा, 9 मे : बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला असून यामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काल 8 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कामगिरी केलीय. या कारवाईबाबतचे व्हिडिओ फुटेज बीएसएफने प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी करणारे हे जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेतील असल्याची माहिती बीएसएफने दिलीय.
जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा –
भारत व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढलाय. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदुरनंतर पाकच्या कुरापती वाढल्या असताना पाकिस्तानी लष्काराकडून सीमेवर गोळीबारास सुरूवात झाली होती. असे असताना पाकिस्तानी डांधार पोस्टवरून पाक रेंजर्सच्या गोळीबाराच्या आडोशात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बीएसएफच्या सतर्क जवानांनी या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत सात दहशतवाद्यांना ठार केले. तसेच डांधार पोस्टला मोठे नुकसान पोहोचवले.
बीएसएफची जबरदस्त कामगिरी –
बीएसएफने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या घुसखोरी करण्याच्या मनसुब्यांना उधळून लावलंय. बीएसएफने केलेली ही कारवाई 2025 च्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात सुरू केलेल्या व्यापक कारवाईचा एक भाग असून या कारवाईमुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. दरम्यान, ही कारवाई “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत करण्यात आली असून या कारवाईचे व्हिडिओ फुटेज बीएसएफने प्रसिद्ध केले आहे.
भारतात अलर्ट –
पाकिस्तानी लष्काराने काल रात्री भारतातील जम्म, राजस्थान तसेच पंजाब या सीमा भागातील राज्यांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरी वस्त्यांमध्ये हा ड्रोन हल्ला करण्याचा पाकचा इरादा होता. मात्र, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना हवेतूनच परतवून लावले. या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी देशभरात विविध ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
हेही वाचा : Breaking : आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, अंतिम टप्प्यातील सामने थांबवले