पुणे, 26 फेब्रुवारी : पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका 26 वर्षाय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अत्याचाराचा आरोप असलेला दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्या भावाकडे त्याची चौकशी सुरु केली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली आहे.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून फलटणला जाण्यासाठी 26 वर्षाची तरुणी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. यावेळी स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली. तेव्हा एका अनोळखी इसमाने तिच्याशी ओळख करत तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. यानंतर माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असे त्या मुलीने सांगितले. मात्र, सातारला जाणारी बस ही दुसऱ्या ठिकाणी लागली असल्याचे त्या इसमाने सांगितले. दरम्यान, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती आणि हीच बस साताऱ्याला जाणार असे त्या इसमाने सांगितले.
यानंतर पीडित तरूणी त्या इसमाच्या मागे गेली असता, तू टॉर्च लावून आतमध्ये जा, असे त्याने सांगितले. दरम्यान, पीडित तरूणी बसमध्ये गेल्यानतंर स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.
दरम्यान, सदर आरोपी घटनास्थळावरून तिथून पसार झाला. यानंतर पीडित तरूणीने त्याच्या मित्राला याबाबतची माहिती दिल्यानंतर त्या दोघांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी आठ पथके नेमण्यात आली आहेत. तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिलीय.
हेही पाहा : Buldhana Hairfall: तुमच्या जिल्ह्यातही घडू शकते अशी केसगळतीची घटना?, डॉ. हिम्मतराव बावस्कर Interview