आंबेगाव (पुणे), 21 फेब्रुवारी : महाराष्ट्रामध्ये निष्ठावान लोकांची गरज आहे. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू आणि निष्ठवंतांना निवडून आणू. तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवर टीका केली. तुरूंगापेक्षा भाजप बरा, अशी राजकीय स्थिती झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांवर केली टीका –
शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात येते. मी तुम्हाला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी. एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करत आहे हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची, यामध्ये बदल करायचा की नाही, ठरवले तर आपण करू शकत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका –
शरद पवार म्हणाले की, तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा ही त्यांचं वैशिष्ट्य होतं, पण आज काय पाहतो आपण? त्यांना आम्ही सगळं दिलं. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता केली.