जळगाव, 2 मे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दौरे व जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रमुख शरद पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शरद पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर –
महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते चोपडा आणि मुक्ताईनगर याठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तसेच भुसावळ येथे ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.
‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन –
शरद पवार यांच्या उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. तसेच संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुलात शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख लढत –
महाविकास आघाडीकडून रावेर लोकभा मतदारसंघ हा शरद पवार गटाच्या वाटेला गेला असल्याने उद्योजक श्रीराम पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी देत उमेदवारी जाहीर केली. यानंतर दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असताना रक्षा खडसे हॅट्ट्रिक करणार की श्रीराम पाटील हे पहिल्याच निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : फायनल यादी! जळगाव लोकसभेसाठी ‘हे’ उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात; वाचा, एका क्लिकवर