ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 मे : पाचोरा-भडगाव तालुक्यातील शिवसेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच महिनाभराच्या आत 1 लाख सभासदांची नोंदणी करण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला असून जून महिन्यापर्यंत पाचोरा-भडगाव मतदारसंघातून 1 लाख सभासदांची नोंदणी करू, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख विनोद तावडे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे कार्यकारणीबाबत आमदार किशोर आप्पा काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शिवसेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना त्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, येत्या महिन्याभराच्या आत पाचोरा-भडगाव मतदारसंघातून किमान एक लाख सभासदांची नोंदणी शिवसेना-युवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने माध्यमातून करू, असा निश्चय शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख डॉ. श्रीकांत शिंदे यांना आश्वासित करू इच्छितो की, जून महिन्यापर्यंत पाचोरा-भडगाव मतदारसंघातून 1 लाख सभासदांची नोंदणी करू, अशी ग्वाही देत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
याबरोबरच तालुकास्तरीय नियुक्त्या झाल्यानंतर 25 तारखेच्या आत शंभर टक्के नियुक्त्या करण्याचे ठरवले आहे. यामुळे शिवसेनेशी संलग्नित सर्व संघटनांच्या नियुक्त्या ह्या येत्या 25 तारखेच्या आत होणार असून 25 तारखेला नियुक्तीपत्राचे आदेश देण्यात येणार आहेत, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.