चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकिट कापण्यात आलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. दरम्यान, या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
करण पवार यांना उमेदवारी –
गेल्या अनेक दिवसांपासून उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतरनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीच्या उमेदवारीसाठी दावेदार मानेल जाणारे उन्मेष पाटील यांच्याऐवजी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे.
कोण आहेत करण पवार?
करण पवार यांनी पारोळा नगरपालिकेचे 2009 आणि 2014 असे दोन वेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू असून राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत. करण पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असून मराठा समाजाचा तरूण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच उन्मेष पाटील व करण पवार हे दोघे जवळचे मित्र मानले जातात. दरम्यान, भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरोधात ते मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत