चाळीसगाव – 5 वर्षात एकही सिंचन प्रकल्प झाला नाही. तर मग सिंचन प्रकल्प, साठवण बंधारे नसतील, आम्हाला गोठे, विहिरी मिळत नसतील, शेतकऱ्यांसाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी काम करत नसतील, तर अशा लोकप्रतिनिधींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला साहेब (उद्धव ठाकरे) मार्गदर्शन करुन एक वज्रमूठ बांधण्यासाठी आपल्यात आले आहेत, असे प्रतिपादन चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेसेनेचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी केले.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात काल शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत बोलताना उन्मेश पाटील यांनी मतदारसंघातील रखडलेल्या कामांचा तसेच विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या कारकिर्दीवर जोरदार टीका केली. तसेच रखडलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला.
काय म्हणाले उन्मेश पाटील –
मतदानाला जाण्याआधी आपल्या अंतर्मनाला चार प्रश्न विचारा. सद्सद्विवेक बुद्धीने मतदानाला जाऊया. राजीवदादा आमदार होते, मी आमदार होतो, एमआयडीसीमध्ये मुहूर्तमेढ झाली. हजार कोटींचे उद्योग आले. पाणीपुरवठा एमआयडीसी 21 फीडर आले. चाळीसगावमध्ये उद्योगाचे जाळे तयार झाले. पण 5 वर्षात एक तरी उद्योग चाळीसगावात आला का, एक तरी रोजगार निर्माण झाला का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. मग जर आम्हाला रोजगार निर्माण होत नसतील, उद्योग निर्माण होत नसतील, तर अशा भाजपला हद्दपार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शेतकरी बंधुंनो विचार करा, आपण लोंढे वरखेडे बॅरेजची मुहूर्तमेढ राजीवदादांनी केली आणि नंतर आपण एकरकमी 500 कोटी रुपये आणून तो प्रकल्प पूर्ण केला आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाणी आणण्याचे काम आपण केले. आपण 750 बंधारे केले. तितूर डोंगरीचे पुनर्जीवन केले. 9 हजार गोठे दिले. ट्रॅक्टर, टिलर, रोटाव्हिटर, बसस्टँड, आरोग्यसंकुल दिले. आपण या सर्व सुविधेतून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेमध्ये पाणी आणण्याचे काम केले. मात्र, 5 वर्षात एकही सिंचन प्रकल्प झाला नाही. तर मग सिंचन प्रकल्प, साठवण बंधारे नसतील, आम्हाला गोठे, विहिरी मिळत नसतील, शेतकऱ्यांसाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी काम करत नसतील, तर अशा लोकप्रतिनिधींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला साहेब (उद्धव ठाकरे) मार्गदर्शन करुन एक वज्रमूठ बांधण्यासाठी आपल्यात आले आहेत.
चाळीसगावची एक सामाजिक परंपरा आणि उंची असलेले हे शहर आहे. चाळीसगाव शहरात जगविख्यात चित्रकार के. के. मूस, जगाला शून्याचा ठेवा देणारे भास्कराचार्य आणि वेगवेगळ्या अंगाने एक चांगल्या सांस्कृतिक उंची असलेले चाळीसगाव, मागील 5 वर्षात गांजा, चरस, गुटखा, ड्रग्स माफिया ललित पाटीलचा चाळीसगावातला 3 दिवसांचा मुक्काम या चाळीसगावला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, याचेही भान आपण ठेवायचे आहे. म्हणून चाळीसगावमध्ये जो उन्माद सुरू आहे, जी दादागिरी सुरू आहे, जी दहशत सुरू आहे, जे भूमाफिया याठिकाणी भुखंडच्या भूखंड हस्तगत करत आहेत, याठिकाणी श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे, गरीब हा गरीब होत चालला आहे, शेतकरी अडचणीत आहे, तरुणाच्या हाताला काम नाही, शाश्वत विकास नाही, म्हणून आज तो विकासाचा फुगा, जो सांगितला जातो, जो आकडा सांगितला जातो, त्यातले 80 टक्के कामांना बजेट मंजूर झालेले नाही. केवळ बोर्डवर, कागदावर कामे आहेत. मात्र, त्यातले 80 टक्के कामे सापडणार नाही. त्यामुळे तुमच्या आमच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मी उतणार नाही, मी मातणार नाही, घेतलेला वसा सोडणार नाही, असे वचनही त्यांनी सर्वांसमोर मतदारसंघातील जनतेला दिले.
नवीन विकासांची क्रांती पर्वाला सुरुवात करूया. आपणच उन्मेश पाटील आहात, आपणच राजीवदादा आहात, आपण महाविकास आघाडीचे घटक आहात, असे समजून मशालीतून क्रांती करावी, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. दरम्यान, या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.