जळगाव, 11 ऑगस्ट : महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जळगावात जोरदार आंदोलन केले. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, या मोर्चात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत महायुती सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत, नोटा उधळत मंत्र्यांचा निषेध नोंदवला. यासोबतच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच महायुती सरकारमधील मंत्र्यांचे पुतळे जाळत त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
View this post on Instagram
यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, नंदुरबार जिल्हा व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, करण पवार, दीपकसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी –
ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्या आंदोलनाची समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकावरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक तिरडी जाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता भर रस्त्यात जाळपोळ केली.
संपर्कप्रमुख संजय सावंत काय म्हणाले? –
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सर्वत्र महायुती सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. मंत्री भ्रष्टाचार करत असताना तसेच मंत्री सभागृहात रमी खेळत असताना देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अशापद्धतीचे गेंड्याच्या कातडीचे हे सरकार असल्याने महाराष्ट्रातील जनता यांच्याविरोधात पेटून उठली असून त्या सरकारविरोधात आज जळगावध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले. दरम्यान, निर्ढावलेल्या सरकारमधील मंत्री लोकांच्या लक्षात येण्यासाठी वादग्रस्त मंत्र्यांचे प्रतिमात्मक पुतळे तयार करून जाळण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. शिवसैनिक स्वखर्चाने मोर्चात सहभागी झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
उन्मेष पाटील यांची जोरदार टीका –
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील म्हणाले की, ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्राची मान खाली घालवली त्यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढत पुतळ्याचे दहन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून निवदेन देऊन मंत्र्यांनी आतातरी भानावर यावे, अशी विनंती करणार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात चार मंत्री आहेत. मात्र, ते आता कुठे जाऊन बसले आहेत असा सवाल करत उन्मेष पाटील यांनी सांगितले की, गेल्या 21 दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय. कापूस, मूग, ज्वारी, तूर, बाजरी, उडीद तसे मका पिके करपत आहेत. तरी देखील मंत्री एकही शब्द बोलायला तयार नाहीयेत.
मी व्यक्ती द्वेषातून त्यांच्याबाबत बोलत नाहीये. मात्र, केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पीकविम्याचे पैसे मिळत नाही. वादळात नुकसान झाले तरी देखील केळी उत्पादकांना त्यांची भरपाई मिळाली नाही. जळगाव जिल्ह्यात चार-चार मंत्री असूनही एक नवीन उद्योगही जिल्ह्यात आलेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची कोणातही हिंमत राहिली नसल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांवर जोरदार टीका –
वस्त्रोद्योग मंत्री जळगाव जिल्ह्याचे आणि टेक्सटाईल्स पार्क अमरावतीला, जलसंपदा मंत्री जळगावचे आणि सात बंधारे तसेच नार-पार गिरणावर प्रकल्पाबाबत प्रत्याक्षात कृती नाही. तसेच स्वतःला पाणी वाला बाबा म्हणणारे गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या गावात धरणागावात प्यायला पाणी नाही, अशा मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील तसेच संजय सावकारे यांच्यावर उन्मेष पाटील यांनी जोरदार टीका केली.