धरणगाव, 8 डिसेंबर : गुलाबराव देवकर अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आमच्या हक्काचे तिकीट आम्ही उदार मनाने गुलाबराव देवकर यांना दिले आणि आता आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देवकर यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सांगितले. धरणगावात ठाकरेंच्या शिवसेनेकडून गुलाबराव देवकर यांच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देवकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गुलाबराव वाघ काय म्हणाले? –
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ याबाबत बोलताना म्हणाले की, गुलाबराव देवकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की मी अजित पवार गटात जाणार आहे. याठिकाणी मतदान केल्याची बोटाची शाई निघत नाही. तोपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पलटी मारण्याचा निर्णय घेतला. ज्याठिकाणी विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त मेहनत घेत 85 हजार मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
View this post on Instagram
आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ –
वाघ पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत धरणगाव शहरात महाविकास आघाडी साडेचार हजार मतांनी मागे असताना आम्ही विधानसभा निवडणुकीत याठिकाणी मोठे प्रयत्न केले. परंतु, काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलवतात. पण नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना भावनकी सोडावी लागते. मात्र, आमच्या हक्काचे तिकीट आम्ही गुलाबराव देवकर यांना दिले आणि आता आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे गुलाबराव देवकर यांच्याविरोधात आत्मक्लेश आंदोलन करत आम्ही तीव्र भावना व्यक्त करत असल्याचे गुलाबराव वाघ यांनी सांगितले.
गुलाबराव देवकर अजित दादा गटात जाणार –
गुलाबराव देवकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत सहभागी व्हावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या 9 डिसेंबर रोजी ते अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी जाऊन त्यांचे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणार आहेत. यानंतर त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबतची माहिती समोर येणार आहे.
हेही वाचा : Video : “….तर अधिक जवळचे संबंध येऊ शकतात!”, देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया