नाशिक : आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार सांगत असतो की, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल की आपण काय चुका केल्या, या शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
नाशिक येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मोठ्या दंगलीचे मास्टरमाईंड हे नेहमी सरकारमध्येच असतात. सरकार कुणाचं आहे, तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत आहात, काही लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवत आहात, त्यांनी भडकावू वक्तव्य केली किंवा त्यांच्यामुळे दंगल भडकली, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ते तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत.
तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकाऱ्यांनाही सोडलं नाही. उगाच शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेऊ नका.
तुमच्याच मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतले पाहिजे. नुसते विरोधकांवर चिखलफेक करायची, त्याला राज्य करणं म्हणत नाहीत. ठिक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार सांगत असतो की, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल की आपण काय चुका केल्या, या शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर कामे –
तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं. तुम्ही कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करू शकला असता. काहीच हरकत नव्हती करायला. पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबानं मंदिरं तोडली. तुम्ही काल लोकशाहीचं मंदिर तोडलं. आणि जर तुम्हाला अनधिकृत बांधकामं तोडायची असतील तर बुलडोझर मलबार हिलला फिरवा. सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर कामे झालेली आहेत. महापालिकेच्या परवानग्या न घेता वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावे. सगळे अधिकारी असतील. मंत्री असतील, प्रत्येकाच्या घरात अनधिकृत कामे झालेली आहेत, असा दावाही त्यांनी केला.