ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 ऑगस्ट : पाचोऱ्यात आल्यानंतर सर्वप्रथम स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांची आठवण झाली. त्यांनी सातत्त्याने शेतकऱ्यांचा तसेच सर्वसामान्यांचा विचार करत त्यापद्धतीचे प्रश्न माडंले. आर. ओ. तात्या हे निष्ठावंत होते. मात्र, त्याच पाचोऱ्यात या आमदारांनी त्या निष्ठेला कलंक लावला, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत हा कलंक धुवून काढायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाचोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् –
मला आज सकाळी उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी कुठे जाणार असल्याचे विचारले. मी त्यांना पाचोरा येथे सभेला जाणार असल्याचे सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की, मी दोन वेळा त्याठिकाणी सभेला येऊन गेले. पाचोऱ्यात ज्या पद्धतीचे वातावरण आम्हाला दिसले त्यावरून वैशालीताई, उद्या विधानसभेत पाहोचल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री आहे, असे राऊत यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊत काय म्हणाले –
एकीकडे लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 1500 रूपये द्यायचे आणि दुसरीकडे महिलांची अब्रू लुटली जात आहे. राज्यातील महिला-मुली सुरक्षित नाहीयेत, त्यांच्यावर शाळा-कॉलेजमध्ये अत्याचार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, राज्यातील मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान एकही शब्द बोलायला तयार नाहीयेत, हे दुर्दैवी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लाडका शेतकरी योजना काढतील, लाडका गद्दार अशा या सगळ्या योजना काढतील. मात्र, अशा कितीही योजना काढल्या तरी राज्यातील जनता ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान करणार नाही, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात एकाच वेळी 80 गद्दार निर्माण झाले. इतिहासात महाराष्ट्राने अशी गद्दारी पाहिली नव्हती. नरेंद्र मोदी-अमित शहा या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे नुकसाने केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप त्यांनी केले, महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, या शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
गोंडगाव प्रकरण –
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मला वैशाली सुर्यंवशी यांनी पाचोऱ्यात आल्यानंतर सांगितले की, पाचोरा तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात होती. यावेळी आमदारांनी हे प्रकरण फास्ट्र्रॅक कोर्टात चालवू, असे सांगितले होते. मात्र, आजही आरोपी मोकाट आहेत. एक वर्ष होऊनही पीडितांना न्याय मिळाला नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. तिथे जाण्याची गरज असताना ते युक्रेन-पोलंडला जात आहे. शपथविधी होताच मोदी रशियाला गेले आणि पुतीनेसोबत चहा पित होते. मात्र, नरेंद्र मोदी यांना देशात आणि महाराष्ट्र हुकमशाही आणायची होती. मात्र, महाराष्ट्राने हे होऊ दिले नाही. मराठी माणसाने हे काम केले. दरम्यान, आता मंत्रालयात जा आणि त्यांना खुर्चीपासून खाली खेचा, अशा लोकांच्या भावना आहेत. महायुतीला सत्तेतून उतारायचे असेल आणि महाराष्ट्र वाचवायचा असेल तसेच राज्यातील नेतृत्व ठरवायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने जबाबदारी स्विकारली पाहिजे, असेही ते म्हणाले.
…त्यांना शिवसेना चोरता येणार नाही –
कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतान उल्लेखनीय कार्य केले. मात्र, ज्या पद्धतीने सत्तेवरून उतरवण्याचा प्रयत्न झाला, त्या सगळ्यांचा आपल्याला सूढ घ्यायचा असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. तुम्ही धनुष्यबाण चोरला. घड्याळ चोरली. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा एकनाथ शिंदे हे चार वर्षांचे होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना ही शिंदेंची असल्याची सांगितले. हाही आपल्या देशातली कायदा आहे आणि याला जबाबदार फक्त नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. ज्यांच्या हातात आपण सत्ता देऊन चूक केली त्यांनी महाराष्ट्र खराब केला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. दरम्यान, त्यांचे शंभर बाप आले तरी शिवसेना त्यांना चोरता येणार नाही, या शब्दात राऊत यांनी निशाणा साधला.
वैशाली सुर्यवंशी यांना मोठी जबाबदारी मिळणार? –
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळवता आले नाही. महाराष्ट्रातील पाच तर देशात 40 ते 45 जागा चोरल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे नरेंद्र मोदींचा पराभव हा लोकसभा निवडणुकीत झाला असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच दोन महिन्यांनी होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणते बटन दाबायचे, हे पाचोरेकरांना माहितीये. यावेळी पाचोरा हा मशालीच्या तेजाने तळपळून राहिल्याशिवाय राहणारा नाही, अशी मला खात्री आहे. यामुळे वैशालीताई नुसतंच आमदार होणार नाहीत तर त्याही पलीकडे महिला म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची असेल तर त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन राऊत यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी व्यासपीठावर खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, कमल पाटील, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, करण पाटील, गजानन मालपुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उध्दव मराठे, अभय पाटील, अरूण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, ललीता पाटील, योजना पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, दीपक पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, तिलोत्तमाताई मौर्य आदींसह शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थिती होते.
हेही वाचा : ‘काही लोकं बेईमान झाले असले, सोडून गेले असले तरी…’, जळगावात येताच संजय राऊत यांची जोरदार टीका