चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 6 ऑक्टोबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षातील नेत्यांकडून राज्यातील विविध भागात दौरे केले जात आहेत. असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांना आज जळगावात भेट दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसोबत पक्षसंघटनेबाबत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांना माध्यमांसोबत बोलताना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत? –
जळगावात माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जळगाव ग्रामीण ही अनेक वर्षांपासून जिंकणारी शिवसेनेची जागा आहे. येथे आमचे आमदार जरी गद्दार झाले असले तरी जागा आमचीच आहे. इकडची जनता वर्षांनुवर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेलाच मतदान करते. ते कुठल्या डुप्लीकेट शिवसेनाला मतदान करणार नाहीत. एकमेकांच्या सहकार्याने महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढवू, असेही ते म्हणाले.
जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक मशालीवरच! –
शिवसेनेतील काही बेईमान लोक सोडून गेले असतील तरी मतदार बेईमान झाली नसून ते आमच्या बरोबरच आहेत. जळगाव जिल्ह्यात आमच्या हक्काच्या पाच जागा असून यापेक्षा एक किंवा जास्त जागा आमच्या वाटेला येऊ शकते. जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक मशालीवरच लढवली जाईल, असे स्पष्ठ वक्तव्य राऊत यांनी यावेळी केले.
View this post on Instagram
मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील केलंय वक्तव्य –
संजय राऊत यांच्या दौऱ्यापुर्वी काल शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी गुलाबराव देवकर हे शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीणमध्ये ते तुमच्याविरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी गद्दारी करावी, याचा मला आनंद आहे. काही लोकं मलाच गद्दार म्हणत होते आणि आता तिकिट मिळण्यासाठी काही जण पक्षांतर करतील तर त्यांना काय साधू म्हणाल का? असा प्रश्न करत जळगाव ग्रामीणमध्ये त्यांना आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल असे मी भाकित केले असून ते भाकित माझे खरे ठरणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले होते.
गुलाबराव देवकर यांचं काय होणार? –
गेल्या दीड वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट पडले. या पक्षफुटीनंतर जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांनी मतदारसंघात पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी प्रयत्न केलेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी अर्ज देखील केला असल्याचे त्यांनी अलीकडेच स्पष्ठ केले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये होत असलेल्या राजकीय हालचाली तसेच शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे जळगाव ग्रामीणची कुणाला उमेदवारी मिळणार आणि गुलाबराव देवकर यांचं काय होणार?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत