ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 ऑगस्ट : उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी गद्दारी केली आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले. शिवसेनेने एवढे सगळं देऊन सुद्धा संघटनेसोबत बेईमानी का? असा प्रश्न माझ्यासह मतदारसंघातील सर्वांना पडला. तात्यासाहेब असते तर त्यांनी हा गद्दारीचा प्रकार सहन केला नसता. यामुळे तात्यांची लेक म्हणून मला हे सहन झाले नाही. मला तर राजकारणात यायचं नव्हतं. पण ह्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि तात्यांची विचारधारा सोडायची नाही म्हणून मी मातोश्रीवर जाऊन प्रवेश करत राजकारणात सक्रिय झाले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांचे थेट नाव न घेता टीका केली.
काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी? –
जे गद्दारी करून गेले ते इतिहासाची जीर्ण पाने होती. आपल्यासोबच जे आहेत ते इतिहास घडविणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आणि या निष्ठावंतांच्या हातात असलेल्या मशालीने येणाऱ्या विधानसभेत या गद्दारीचे पाप जाळायचंय. ही मशाल इतिहास घडवणार, अशा शब्दात विश्वास व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
…म्हणून मी राजकारणात सक्रिय झाले –
वैशाली सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून तात्यासाहेब निवडून आले आणि 10 वर्ष विजयाची घौडदौड सुरू राहीली. तात्यांच्या नेतृत्वात सगळ्याच ठिकाणी शिवसेना निष्ठावंतांची मोठी फौज उभी राहिली. शिवसेनेने दोन वेळा आमदार निवडून दिले. आमच्या घरात 2 वेळा आमदारकी दिली. मानसन्मान दिला. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आमच्या घरात दिले. शिवसेनेने एवढे सगळं देऊन सुद्धा संघटनेसोबत बेईमानी का? असा प्रश्न माझ्यासह मतदारसंघातील सर्वांना पडला. उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले.
तात्यासाहेब असते तर त्यांनी हा गद्दारीचा प्रकार सहन केला नसता. यामुळे तात्यांची लेक म्हणून मला हे सहन झाले नाही. मला तर राजकारणात यायचं नव्हतं. पण ह्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि तात्यांचा विचारधारा सोडायची नाही म्हणून मी मातोश्रीवर जाऊन प्रवेश करत राजकारणात सक्रिय झाले. सर्वच म्हणतात की, मला काय अनुभव नाहीये. पण मला अनुभव नसेल तर मला भ्रष्टाचाराचा, गद्दारीचा, लाचारीचा अनुभव नाहीये. मात्र, नवीन शिकण्याची माझी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून तात्यासाहेबांची मी मुलगी असून मी सर्व करून दाखवणार, असा निर्धार वैशाली सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. दरम्यान, टक्केवारी, भूखंडाचा बाजार, कमिशन भ्रष्टाचार मुक्त करून मतदारसंघातील सर्वांगीण विकास करण्याचा अजेंडा मी काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तात्यांचा फोटू वापरायचा नाही –
आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, तुम्ही का म्हणून तात्यांचा (आर.ओ.पाटील) फोटो वापरतात. तुम्ही निष्ठा सोडली आहे म्हणून तुम्ही तात्यांचा फोटू वापरू शकत नाही, हे मी वारंवार सांगत आलीय. दरम्यान, यापुढे तात्यांचा फोटू वापरायचा नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. निष्ठेची किंमत तुम्हाला काय कळणार, अशा शब्दात त्यांनी आमदार पाटील यांचा समाचार घेतला.
एक नवा इतिहास घडवायचाय –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवण्याची संधी निर्माण करून दिलीय. मला असं वाटतं की, मतदारसंघातील हा नारीशक्तीचा सन्मान आहे, मतदारसंघातील महिला-भगिनी माझ्या पाठिशी भक्कमपणे उभ्या आहेतच. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने या मतदारसंघात एक नवा इतिहास घडवायचाय असल्याचे वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या.
तर लाडकी बहिण योजना काय कामाची? –
राज्य सरकराने शक्ति कायदा पारित केला नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये हा बदल घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना राज्यात महिला तसेच मुलींवर अत्याचार होताएत. जर महिली सुरक्षित नसतील तर लाडकी बहिण योजना काय कामाची असा प्रश्न उपस्थित करत वैशाली सुर्यवंशी यांनी बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणावरून सरकारवर टीका केली. दरम्यान, महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात 24 ऑगस्टला महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. या बंदला उत्फर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका –
स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेले. मात्र, आजही मतदारसंघातील काही गावांमध्ये सुरळितपणे पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप वैशाली सुर्यवंशी यांनी केला. दरम्यान, त्यांनी विकासाची व्याख्या बदलवून टाकली असल्याची टीका वैशाली सुर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर केली. मतदारसंघात रस्त्यांची अवस्था बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांत कुठेही न फिरणारे आज गावा-गावात घरोघरी पाय पडत फिरत असल्याचीही टीका त्यांनी केली. गल्ली-बोळात जाऊन बळजबरीने पक्षप्रवेश करून घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी व्यासपीठावर खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, कमल पाटील, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, करण पाटील, गजानन मालपुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उध्दव मराठे, अभय पाटील, अरूण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, ललीता पाटील, योजना पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी, दीपक पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, तिलोत्तमाताई मौर्य आदींसह शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थिती होते.
हेही वाचा : ‘तात्या हे निष्ठावंत, मात्र त्याच पाचोऱ्यात आमदारांनी त्या निष्ठेला कलंक लावला’, संजय राऊत यांची जोरदार टीका