जळगाव, 19 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना जळगाव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विष्णु भंगाळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश –
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पुर्वी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना जळगावात राजकीय घडमोडींना वेग आला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे विष्णू भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन गुलाबराव पाटील यांनी त्यांना प्रवेश दिला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विष्णु भंगाळे यांची प्रतिक्रिया –
शिवसेना फुटीनंतर मी सातत्याने पक्ष संघटनेसाठी काम करत होतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाने माझे तिकीट दिले नाही. यानंतरही पक्षाने ज्या उमेदवारास तिकीट दिले त्यांच्या प्रचाराचे काम करत होतो. जिल्ह्यात इतरही ठिकाणी जात मी शिवसेना उद्धव बाळासाहोब ठाकरे पक्षाचे काम करत होतो. मात्र, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत हे मला आज सकाळी मी पक्षाचे काम करत नसल्याबाबत बोलले.
या पार्श्वभूमीवर उद्या जर लोकसभेप्रमाणे याठिकाणी उमेदवाराचा प्रभाव झाला तर त्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडले जाईल. असे असताना मी त्यांना राजीनामा देत असल्याचे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली आणि शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे विष्णु भंगाळे म्हणाले.
जळगावात ठाकरे गटाला धक्का –
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर विष्णू भंगाळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाणे पसंत केले. यानंतर त्यांनी पक्ष संघटनेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर नेतृत्व केले होते. असे असताना त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विष्णू भंगाळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तसेच विष्णू भंगाळेंच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाचा फायदा हा आमदार सुरेश भोळे यांना होण्याची शक्यता आहे.
हेही पाहा : Video : प्रचारतोफा थंडावल्या; आता उत्सुकता मतदानाची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद