जळगाव : ‘जरी काही लोकं बेईमान झाले असले, सोडून गेले असले, तरी जळगाव जिल्ह्यात ज्या आमच्या शिवसेनेच्या जागा आहेत, त्या सर्व जागा आम्ही ताकदीने लढू आणि पुन्हा जिंकून आणू’, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच हीच आमची तयारी आहे आणि हीच आमची रणनिती आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत हे आजपासून 3 दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावात आगमन झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
तुम्ही जबाबदारी घेऊन सत्तेचा त्याग करावा –
बदलापूर प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, गिरीश महाजन काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेने गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर हे देऊ शकले नाही. मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी जनतेच्या संतापाचा सामना ते करू सकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही, तेव्हा मग विरोधकांचा हात आहे, विरोधकांचा कारस्थान आहे, विरोधक राजकीय पोळी शेकत आहेत, अशाप्रकारचे आरोप करायचे. त्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सरकार आहात, तुमच्या राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असतील, लहान मुलांवर बलात्कार होत असतील, तर तुम्ही जबाबदारी घेऊन सत्तेचा त्याग केला पाहिजे, अशी टिकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला –
पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्राची वाट लागली आहे. महाराष्ट्र बदनाम झाला आहे, महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालं, विषारी झालं, या सगळ्यांचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्यापासून पोलिसांची भूमिका ही कायम संशयास्पद राहिली आहे, पोलिसांवर कायम दबाव असतो, गुन्हेगारांना सोडण्यासाठी दबाव असतो, आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना मदत करण्याचा दबाव असतो, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचा दबाव असतो, त्यामुळे आम्हाला पोलिसांची दया येते, या शब्दात संजय राऊत यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली.
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद –
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला सर्व नेते उपस्थित होते. यामध्ये आम्ही जागावाटपा संदर्भात चर्चा करणार होतो. पण काल बदलापूरमध्ये लहान मूलींवर जो प्रकार अत्याचाराचा प्रकार घडला, त्यानंतर आम्ही ठरवले की आपण, महाराष्ट्राच्या स्थितीवर बोलावं. महाराष्ट्रातील जे अपराधीकरण वाढलं आहे, महिलांवर अत्याचार वाढले आहे, त्यासंदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यावी लागेल, यावर चर्चा केली. त्यात असं ठरलं की, महिलांवरील अत्याचाराचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक द्यावी आणि 24 ला आम्ही महाराष्ट्र बंद करतोय. तशी घोषणा केली आहे, तशी तयारी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदींच्या दौऱ्याआधी राऊत यांचा दौरा –
येत्या 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी ठाकरे गटाचे नेते हे आजपासून तीन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मोदी त्यांच्या कामासाठी आले. आम्ही महाराष्ट्राच्या कामासाठी आलो आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे जळगाव आणि बाकीचे दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीची तयारी, शिवसेनेची, त्याची माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे.