चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौऱ्याला नांदेडपासून सुरूवात झाली आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी युवासेनेतर्फे राज्यव्यापी आभार दौऱ्याचे नियोजन करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात ही 10 फेब्रुवारीपासून खान्देशातून सुरू होणार आहे.
युवासेनेतर्फे राज्यव्यापी आभार दौऱ्याचे नियोजन –
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अफाट समाजसेवारुपी कार्यावर केलेल्या अभूतपूर्व मतदानरुपी आशीर्वादा अंतर्गत मतदार राजाचे आभार प्रकट करावे तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थांनच्या निवडणुकीअंतर्गत युवासेनेची अंतर्गत बांधणी अधिक भक्कमपणे व्हावी तसेच जनसामान्याशी जनसंपर्क अभियाना अंतर्गत नाळ जोडून पक्षाची दिशा, ध्येय धोरणे जनमाणसात घराघरात पोहचावी याच प्रमुख उद्देशातून युवासेनेतर्फे राज्यव्यापी आभार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, युवासेनेतर्फे या राज्यव्यापी आभार दौऱ्याचे चार टप्प्यात नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 13 मार्च ते 16 मार्च आणि चौथा टप्पा 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान पार पडणार आहे. खान्देशातून पहिल्या टप्प्याची सुरूवात –
युवासेनेतर्फे राज्यव्यापी आभार दौऱ्याची पहिल्या टप्प्याची सुरूवात ही खान्देशातून होणार आहे. उत्तर महाराष्ट्र विभाग ब अंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील मतदारसंघाअंतर्गत 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी रोजी युवासेनेतर्फे आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारीला धुळे, 11 फेब्रुवारी रोजी नंदुरबार तर 13 फेब्रुवारी रोजी जळगावात हा दौरा पार पडणार आहे. सदर दौऱ्याअंतर्गत उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रथमेश पाटील, किशोर भोसले, निखिल चौधरी, डॉ प्रियंका पाटील, योगिता ठाकरे, श्वेता सुयोग, यांच्यासह युवासेना पदाधिकारी-सदस्य सहभागी होणार आहेत. “घरोघरी शिवसैनिक” आणि “गाव तिथे शाखा” यांची अंमलबजावणी करण्याचा देखील उद्देश युवासैनिकांचा असणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात कॉलेज व विद्यापीठ कक्षाची स्थापना करणे, सोशल मीडिया सेलची स्थापना करणे, युवासेना संघटन मजबूत करण्याकरिता प्रत्येक तालुकानिहाय प्रमुख वक्ता तयार करणे, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, विविध शाळा तसेच कॉलेजला भेटी देत करिअर काउन्सिलिंग, शिक्षण साहित्यवाटप कार्यक्रम राबवणे असे व इतर अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. युवासेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत पक्षाची संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत