धुळे : गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यातील एका मुलीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखी वाढवली. यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी मागितली. मात्र, वेळीच पोलिसांच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनचा हा डाव या शिक्षकाने उधळून लावला.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
सोशल मीडियाच्या माध्यमातून नंदुरबार येथील शिक्षकाशी धुळ्यातील एका मुलीने ओळखी वाढवली. त्यानंतर नंतर त्याला धुळे येथील घरी बोलावले आणि 4 युवकांच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागितली.
याप्रकरणी खंडणी स्वीकारताना नंदुरबार येथील चौफलीवर सोमवारी 4 तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच धुळ्यातील या 4 संशयित युवकांना अटक करण्यात आली असून. यासोबतच शिक्षकाला जाळ्यात अडकविणाऱ्या मुलीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ही मुलगी फरार आहे.
ही मुलगी धुळे येथील जीटीपी स्टॉप परिसरातील रहिवासी आहे. या मुलीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. यानंतर या शिक्षकाशी मैत्री केली. तसेच 11 जानेवारी रोजी शिक्षकाला आपल्या घरी बोलावले. त्यानुसार 12 रोजी नंदुरबार येथील शिक्षक धुळे येथे मुलीच्या घरी आला. यानंतर थोड्या वेळातच 3 संशयित मुलीच्या घरात शिरले आणि त्यांनी शिक्षकाचे मुलीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यानंतर तिघांनी शिक्षकाला शिवीगाळ केली तसेच 12 लाखांची खंडणीची मागणी केली.
शिक्षकाने हा संपूर्ण घटनाक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सांगितला. त्यानुसार 13 रोजी नंदुरबार येथे एका कारमध्ये शिक्षकाकडून 12 लाखांची खंडणी घेताना 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
देवेश दीपक कपूर (वय 19), हितेश ज्ञानेश्वर बिन्हाडे (19, दोघे रा. तिरुपतीनगर, बिलाडी रोड, धुळे), हर्षल गोपाल वाघ (21, रा. भगवा चौक, रावेर, ता. जि. धुळे) व विनय देवानंद नेरकर (23, रा. फॉरेस्ट कॉलनी, देवपूर, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या चारही संशयित आरोपींसह फरार मुलीविरोधात देवपूर पोलिसांत बीएनएस कलम 308 (2), 351 (2) (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा – पुतण्याने केला काकाचा खून, मित्राच्या मदतीने केलं हादरवणारं कांड, धक्कादायक घटना