धुळे, 15 मार्च : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या विषबाधेत सुमारे 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र असून या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, काल संध्याकाळी प्रशिक्षार्थी पोलिसांना मेसमधून रात्रीचे जेवण दिले गेले. यानंतर जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले होते. दरम्यान, त्यांना मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ सुरू झाला.
दरम्यान, जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने जवानांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आलेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 100 हून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनी दिली आहे.
हेही वाचा : रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराजी नाट्य, रावेरनंतर चोपड्यात भाजप पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे