बीड, 13 मार्च : बीड जिल्हा अलीकडे जातीय गुन्हेगारीमुळे चर्चेत आला असतानाच बीडच्या पोलीस अधिक्षकांनी मोठा निर्णय घेतलाय. पोलिसांच्या नेमप्लेटवरील आता आडनाव हटवण्यात आले असून आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ त्यांची नावं व पदं नमूद करण्यात आली आहे. आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही, आम्ही सर्वांसाठी केवळ ‘खाकी’ आहोत, असे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा निर्णय घेताना स्पष्ठ केलंय.
बीड पोलिसांचा नेमका निर्णय काय? –
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राज्याच चर्चेत आल्यांतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी असा उपक्रम नवनीत कॉवत यांनी नुकताच हाती घेतला होता. अशातच आता त्यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरील आता आडनाव हटवत फक्त स्वतःचे नाव आणि पद नमूद करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.
याबाबत एसपी नवनीत कॉवत म्हणतात की, कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. तत्पूर्वी, आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला होता. मात्र, आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावे काढून केवळ स्वतःचं नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीडमध्ये वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी आणि पोलीस हा केवळ पोलीस म्हणून ओळखला जावा, तो त्याच्या जातीने, आडनावाने ओळखला जाऊ नये यासाठी कॉवत नवा उपक्रम हाती घेतल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : शिक्षिकेच्या घरात आग अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका जळून खाक, नेमकी घटना काय?